ताज्या बातम्या

ठाण्याचे ज्येष्ठ नगरसेवक राजन नारायण किणे यांना राज्यस्तरीय ‘दलित मित्र पुरस्कार’ जाहीर

ठाणे(गणेश धुळप) : ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मा. श्री. राजन नारायण किणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘दलित मित्र पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
राजन किणे यांचा तब्बल पस्तीस वर्षांचा राजकीय प्रवास ठाणे व विशेषतः मुंब्रा-कौसा परिसराच्या विकासासाठी मोलाचा ठरला आहे. सन १९९७ मध्ये प्रथमच ठाणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्थायी समिती सभापती अशी महत्त्वाची पदे यशस्वीरीत्या भूषवली. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) सदस्यपदी देखील नियुक्ती करण्यात आली.
मुंब्रा शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन, नागरिकांसाठी सुसज्ज व अद्ययावत रुग्णालय, तरुणांसाठी राष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तसेच मुंब्रा बायपाससाठी सातत्याने पाठपुरावा करून तो प्रत्यक्षात आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांची ओळख “मुंब्राचे विकासपुरुष” म्हणून झाली आहे.
दलित व मागासवर्गीय समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुंब्रा पोलीस स्टेशनलगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक निर्मितीत त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संत रोहिदास महाराज जयंती व बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून सामाजिक एकात्मतेचा संदेश ते देतात.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी आर्थिक मदत, शालेय साहित्य वाटप, गणवेश पुरवठा अशी मदत ते सातत्याने करीत असतात. धर्म, जात, पंथ न पाहता सर्वधर्म समभाव जपत त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना आधार दिला आहे. म्हणूनच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नेहमीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.
या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन धगधगती मुंबई वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त राजन नारायण किणे यांना राज्यस्तरीय ‘दलित मित्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा दि. २८ फेब्रुवारी रोजी, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४/५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top