कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : येळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्व. विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला. याठिकाणी सख्खे चुलत बंधू अॅड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांचा पराभव केला. खरं तर अपक्ष निवडणूक लढलेल्या राजाभाऊ उंडाळकर यांच्यामागे भाजपने ताकद उभी केल्याने निवडणुकीत मोठी रंगत आणली होती. राजाभाऊंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपने उदयसिंह उंडाळकर यांच्यावर नेम तर साधला होताच. मात्र उदयसिंह उंडाळकर यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपचा डाव फसला.
खरं तर सातारा जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणून कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते. मागील वेळी प्रमाणे यावेळीही उंडाळकर बंधूंमध्ये निवडणूक लागल्याने संपूर्ण परिसरात मागील महिन्यापासूनच निवडणुकीचे जोरदार वार होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजाभाऊंना आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या भाजपने पाठींबा दिल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत होती. आजच्या मतमोजणीत सुद्धा पहिल्या फेरीपासून उदयसिंह उंडाळकर आणि राजाभाऊ उंडाळकर यांच्या अगदीच कमी मतांचा फरक होता. मात्र अखेर उदयदादांनी विजय खेचत आपणच या संपूर्ण भागाचे किंग आहोत ते दाखवून दिले.
उदयसिंह उंडाळकर यांनी काही महिन्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
घड्याळ हाती घेतल्यानंतर हि त्यांची पहिलीच वैक्तिक लढाई होती. उदयसिंह उंडाळकर याना या निवडणुकीत शरद पवार गट, काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मोठी साथ मिळाली. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याचा फायदा उदयसिंह उंडाळकर याना झाला. त्यातच आधीपासूनच त्यांनी निवडणुकीची तयारी केल्याने त्यांचा विजय सोप्पा झाला. अतिशय सूक्ष्म निवडणूक नियोजन, युवकांची फळी, विलासकाका उंडाळकर यांच्यावर प्रेम करणारे मूळ निष्ठावान कार्यकर्ते आणि भाजपविरोधी विचाराची लोक उदयसिंह उंडाळकर यांच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहिली. उदयसिंह उंडाळकर यांचे सुपुत्र अधिराज उंडाळकर यांनीही वडिलांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. युवा वर्गाला एकत्र करत त्यांनी संघटन वाढवण्यात हातभार लावला, गावागावात जाऊन, लोकांमध्ये मिसळत राष्ट्रवादीचे घड्याळ कराड दक्षिणेच्या खेड्यापाड्यात पोहचवले. याचा परिणाम उदयसिंह उंडाळकरांच्या विजयाच्या रूपाने बघायला मिळाला.




