ताज्या बातम्या

कराड तालुक्यातील मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना ; निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे मार्गदर्शन

कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : शनिवार, दिनांक ७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कराड तालुक्यातील एकूण ४८६ पथकांतील मतदान कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर ६६ एसटी बस, १८ मिनी बस व ८ जीपमधून आपापल्या मतदान केंद्राकडे आवश्यक मतदान साहित्यांसह आत्मविश्वासाने रवाना झाले.
मतदान प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना तिसऱ्या प्रशिक्षणाअंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया ही पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध पद्धतीने पार पाडावी, तसेच मतदारांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर मतदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी साहित्याची सखोल तपासणी करून खात्री केली व सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी प्रशासनामार्फत बस, मिनीबस तसेच जीप अशा वाहनांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शांततेत, पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
चौकट
पथकासोबत मेडिकल किट …. मच्छर अगरबत्तीही..!
निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीची शांत झोप घेता यावी व दिवसभर उत्तम कामकाज करता यावे यासाठी मच्छरांपासून संरक्षण म्हणून प्रत्येक टीमसोबत मच्छर अगरबत्ती देण्यात आली आहे. तसेच आरोग्याची काळजी म्हणून मेडिकल बॉक्स व त्यावर कोणत्या आजारासाठी कोणती गोळी याच्या माहितीसह प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात आले आहे, तसेच प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षांनी दीड दिवसाचा डॉक्टर बनून आपल्या टीमच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगताच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून या निर्णयाला दाद दिली. कर्तव्यावर जाताना अतुल म्हेत्रे हे आरोग्याची काळजी घेणारे आजपर्यंतचे एकमेव निवडणूक निर्णय अधिकारी असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून दिसून येत होती.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top