धारावी(संतोष कदम) : धारावी प्रभाग क्रमांक १८४ मधील अण्णावेल हॉटेल गल्ली, मुकुंदराव जाधव मार्ग येथे लक्ष्मी किराणा स्टोअर्सच्या पुढील कॉर्नर व जाधव पान-बिडी शॉपच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. या ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
याच ठिकाणी असलेल्या सत्यम बिल्डिंगमधील गटार व ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर साचत असून, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. साचलेल्या कचरा व गटारपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, रोगराई पसरण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या प्रभागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका साजिदा बब्बू खान आहेत. मात्र, या समस्येकडे अद्याप ठोस लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित विभाग व महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कचरा उचलणे, गटार दुरुस्ती व नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




