ताज्या बातम्या

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अजीव यशवंत पाटील;उप-महापौर पदी मार्शल डॉमनिक लोपीस यांची निवड

विरार ( विवेक पाटकर ) :- वसई विरार शहर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई- शहर महानगरपालिकेची मा. विशेष बैठक मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, सर्वसाधारण सभागृह, ४ था मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे मा.पीठासीन अधिकारी मा. डॉ. इंदुराणी जाखड (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी पालघर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या मा. महापौर आणि मा. उपमहापौर पदाच्या निवडणूकीत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी अजीव पाटील तसेच उप-महापौर पदी मार्शल डॉमनिक लोपीस यांची निवड झाली.

सदर निवड प्रक्रियेच्या बैठकीच्या सुरुवातीस महापौर व उपमहापौर पदासाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. छाननी अंती सादर करण्यात आलेले सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले व वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर वैध नामनिर्देशित उमेदवारांना अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठी सादर केलेले नामनिर्देशन पत्र मागे घेणेबाबत विहित वेळ देण्यात आला. यावेळेत महापौर पदासाठी सादर केलेल्या वैध नामनिर्देशित उमेदवारांपैकी प्रफुल्ल जगन्नाथ साने व निशाद अरुणा अरुण चोरघे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले व यानंतर महापौर पदासाठी अजीव यशवंत पाटील व अॅड.दर्शना त्रिपाठी-कोटक यांची नावे अंतीम उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येऊन उपस्थित ११५ सदस्यांनी हात वर करून त्यांना मतदान केले. या मतदान प्रक्रियेत एकूण ११५ मतांपैकी अजीव पाटील यांना ७१, तर अॅड. दर्शना त्रिपाठी-कोटक यांना ४४ मते मिळाली. मतदानाअंती महापौर पदासाठी सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार अजीव यशवंत पाटील यांची महापौर पदी निवड झाल्याचे मा. पीठासीन अधिकारी यांचे मार्फत जाहीर करण्यात आले.

तसेच उपमहापौर पदासाठी सादर केलेल्या वैध नामनिर्देशित उमेदवारांपैकी कन्हैया (बेटा) मनोहर भोईर यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने उपमहापौर पदासाठी मार्शल डॉमनिक लोपीस व नारायण मांजरेकर यांची नावे अंतिम उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येऊन उपस्थित ११५ सदस्यांनी हात वर करून त्यांना मतदान केले. या मतदान प्रक्रियेत एकूण ११५ मतांपैकी श्री.मार्शल डॉमनिक लोपीस यांना ७१, तर नारायण मांजरेकर यांना ४४ मते मिळाली. मतदाना अंती उप-महापौर पदासाठी सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार मार्शल डॉमनिक लोपीस यांची मा.उप-महापौर पदी निवड झाल्याचे मा.पीठासीन अधिकारी यांचे मार्फत जाहीर करण्यात आले.

या निवड प्रक्रीयेवेळी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, महानगरपालिका सचिव विश्वनाथ तळेकर, महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, उपविभागीय अधिकारी वसई शेखर घाडगे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, प्र.शहर अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सदर निवड प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top