ताज्या बातम्या

तळदेव गणात संजय उत्तेकर यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांची मोठी एकजूट; धनशक्तीविरोधात सर्वसामान्य शेतकरी उमेदवाराला संधी देण्याचे आवाहन

तापोळा(नितीन गायकवाड) : पंचायत समिती तळदेव गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय उत्तेकर यांच्या प्रचारासाठी संपूर्ण गणातील ग्रामस्थ एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले संजय उत्तेकर हे स्वर्गीय बाळासाहेब भिलारे, कोंडिबा जाधव तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारणातून राजकारणात आले आहेत. पक्षाने दिलेल्या उमेदवारीला जनतेने न्याय द्यावा, असे आवाहन यावेळी ग्रामस्थांनी ‘मतदार राजा’कडे केले.
प्रचारादरम्यान संजय उत्तेकर म्हणाले की, आजच्या राजकारणात सर्वसामान्य व्यक्ती निवडणूक लढवू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. पैशाच्या जोरावरच उमेदवारी मिळते, अशी धारणा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पैशांपेक्षा विचारांना महत्त्व देत माझ्यासारख्या सामान्य शेतकरी व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी दिली, याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. मागील अनेक वर्षांपासून तळदेव गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकजुटीने विकासकामे केली असून त्याचा आम्हाला अभिमान आहे.
ते पुढे म्हणाले की, विभागाचे सुपुत्र असलेले उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उत्तरेश्वर परिसराचा होत असलेला कायापालट हा आमच्या पाच गावांचा गौरव आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांच्या विचारांमध्ये समन्वय नसल्याने निवडणुका होत आहेत. त्यामुळे या वेळी पक्ष न पाहता धनशक्तीचा पराभव करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन प्रत्येक मतदाराच्या दारी जाऊन ग्रामस्थ करत आहेत.
यावेळी वयोवृद्ध मतदारांनी मत व्यक्त करताना सांगितले की, धनशक्तीच्या जोरावर निवडणुका झाल्या तर हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी उमेदवाराला एकदा संधी द्यावी. मिळालेल्या संधीचे सोने करून तालुक्याचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन उमेदवार संजय उत्तेकर यांनी दिले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top