मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावली-२०२६ निमित्त ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (२८ ऑक्टोबर) केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ही रक्कम अदा करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
दीपावली सानुग्रह अनुदानाबाबतची बैठक महापौर दालनात पार पडली. या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृहनेते गणेश खणकर, विविध राजकीय पक्षांचे गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यंदा राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्र शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करून महापालिकेतील गटनेते, पदाधिकारी, प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी आर्थिक आधार मिळणार असून, नोव्हेंबरच्या नियमित वेतनासोबत सानुग्रह अनुदानाची रक्कम एकत्रितपणे दिली जाणार आहे.




