

नवी मुंबई दि. ०२ : रोजी सिडको सभागृह, वाशी येथे वाहतूक नियंत्रण विभाग, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने ३७ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास नवी मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मिळून सुमारे १००० जणांची उपस्थिती होती.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. स्वप्नील जोशी उपस्थित होते. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त मा. श्री. संजय येनपुरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
सांगता समारोपाच्या प्रसंगी पिल्लई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. आर्ट ऑफ सायलेन्स इंडिया यांच्यावतीने मुक अभिनय सादर करण्यात आला, तर श्रीमती सुचित्रा इंदलकर यांनी पपेट शोद्वारे प्रबोधन केले. यावेळी उपस्थित पाहुणे व प्रसिद्ध गायक श्री. साईराम अय्यर यांनी गायनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते पालकांचे प्रगती पुस्तक (छोटा पोलीस) याचे विमोचन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या सांगता समारंभाचे प्रास्ताविक पोलीस उप आयुक्त (वाहतूक) मा. श्री. तिरूपती काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) मा. पै. श्री. विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




