नवी मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांचे सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे सन 2009-10 पासून सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा क्राईस्ट अकॅडमी स्कुल, से-23, कोपरखैरणे येथील शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर उत्साहात संपन्न झाल्या.
या बास्केटबॉल स्पर्धेमध्ये 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात एकूण 104 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण समिती उपसभापती श्री.राजू मढवी यांच्या शुभहस्ते, समिती सदस्य श्रीम.दिक्षा कचरे, श्रीम.ऐश्वर्या सोनवणे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व शाळेचे विश्वस्त फा.जेसन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील 14 वर्षाआतील मुलांच्या गटात फा.ॲग्नल स्कुल, वाशी विरुद्ध क्राईस्ट अकॅडमी , कोपरखैरणे यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात फा.ॲग्नल स्कुल, वाशी संघाने 23 : 13 अशा 10 गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच दुस-या उपांत्य फेरीत डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल, नेरुळ यांनी न्यु होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली यांच्यावर 06:03 अशा 03 गुणांनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या गटातील अंतिम सामन्यात डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ यांनी फा.ॲग्नल स्कुल, वाशी यांच्यावर 06:04 अशा 02 गुणांनी मात करून अजिंक्यपद पटकाविले आणि मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.
स्पर्धेतील 14 वर्षाआतील मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीत विबग्योर स्कूल ऐरोली यांनी न्यू होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली यांच्यावर 15:08 अशा 07 गुणांनी मात केली तसेच दुस-या उपांत्य फेरीत डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ यांनी रिलायन्स फाउंडेशन स्कूल कोपरखैरणे यांच्यावर 08:02 अशा 06 गुणांनी मात करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या वयोगटातील मुलींचा अंतिम सामना डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ आणि विबग्योर स्कूल ऐरोली यांच्यात होऊन डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ शाळेचा संघ 13:08 अशा 05 गुणांनी विजयी झाला. त्यांनी मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.
स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलांच्या गटातील पहिली उपांत्य फेरी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांनी दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यावर 31:15 अशी 16 गुणांनी जिंकली तसेच दुसरी उपांत्य फेरी डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ यांनी प्रेझेंटेशन कॉन्व्हेन्ट स्कूल नेरुळ यांच्यावर 12:02 अशी 10 गुणांनी जिंकली व अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या फेरीतील अंतिम सामना क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांनी डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ यांच्यावर 28:10 अशा 18 गुणांनी मात करीत जिंकला व मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.
17 वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळ यांनी 16:06 अशा 10 गुणांनी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांच्यावर मात करून जिंकली तसेच दुसरी उपांत्य फेरी टिळक पब्लिक स्कूल नेरुळ यांनी 08:02 अशी 10 गुणांनी फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल ऐरोली यांच्यावर मात करीत जिंकली. या गटातील अंतिम सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ 13:09 अशा 4 गुणांनी टिळक पब्लिक स्कूल नेरूळ यांच्यावर मात करीत अंतिम विजेता ठरला व मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्र झाला.
19 वर्षाआतील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीत क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांनी टिळक ज्युनिअर कॉलेज नेरुळ यांच्यावर 13:11 अशा 02 गुणांनी मात केली तर दुस-या उपांत्य फेरीत फा. ॲग्नल स्कूल वाशी यांनी 27:08 अशी 19 गुणांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी यांच्यावर बाजी मारली. या उपान्त्य फेरीतील विजयी दोन्ही संघांमधील अंतिम सामन्यात फा. ॲग्नल स्कूल वाशी यांनी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांच्यावर 35:20 अशी 15 गुणांनी विजयश्री संपादन केली आणि मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.
या स्पर्धेतील 19 वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी फा. ॲग्नल ज्युनिअर कॉलेज वाशी यांनी डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल नेरुळ यांच्यावर 08:06 अशी 02 गुणांनी मात करून जिंकली तसेच दुसरी उपांत्य फेरी डॉ.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरुळ यांनी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांच्यावर 14:10 अशा 04 गुणांनी जिकली. या गटातील अंतिम लढतीत फा. ॲग्नल ज्युनिअर कॉलेज वाशी यांनी 20:09 अशा 11 गुणांच्या फरकाने डॉ. डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरुळ संघाला पराभूत केले व मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता सिध्द केली.
या बास्केटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे यांनी आपले सुसज्ज असे बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध करुन दिले. नमुंमपा क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे तसेच क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव यांच्या नियंत्रणाखाली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्राईस्ट अकॅडमी शाळेचे सर्व क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेमधून प्रत्येक वयोगटातील अंतिम विजेता संघ हा थेट पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेमध्ये खेळणार असून या संघांना नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री.राजू मढवी यांनी यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.




