तापोळा(नितीन गायकवाड) : तळदेव गटामध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार अजितदादा संकपाळ व पंचायत समिती उमेदवार संजय शेलार यांच्या प्रचारासाठी तापोळा गावातील महिला भगिनी आघाडीवर उतरल्या असून, त्यांच्या मेहनतीमुळेच विजय निर्णायक ठरेल, असा ठाम विश्वास माजी सरपंच दर्शना धनावडे यांनी व्यक्त केला आहे.
तापोळा गावातील या ‘रणरागिनी’ महिलांनी संपूर्ण मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत त्यांना विश्वासात घेण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या सर्व महिला यापूर्वी विविध पक्षांमध्ये कार्यरत होत्या. मात्र उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी तापोळा गावात तसेच महाबळेश्वर तालुक्यात राबवलेल्या विकासकामांमुळे पक्षभेद बाजूला ठेवून त्या एकवटल्या आहेत. शिंदे साहेबांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचे स्वप्न या महिलांनी उराशी बाळगले असून, त्यामुळेच महिला वर्ग या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रचारात सहभागी झालेल्या बहुतांश महिला उच्चशिक्षित असून, भारतीय संविधानामुळे आज एक महिला महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री होऊ शकते, तर आपणही मागे का राहायचे नाही, या विचाराने त्या प्रेरित झाल्या आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य व दर्जेदार शिक्षण या मुद्द्यांवर त्या प्रचार करत असताना शेतकरी महिला व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधत माणुसकीची नाळ जपत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे कुटुंबांना दिलासा मिळत असल्याने महिलांनी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले आहेत. शेतकरी महिलांनी थेट शिंदे साहेबांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. याच उद्देशाने महाबळेश्वर तालुक्यात भगवा फडकवून प्रत्येक मायमाऊलीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जनसंवाद घडवून आणण्याचे आश्वासन महिला कार्यकर्त्यांनी दिले आहे.
कोणत्याही आमिषाला बळी न पडता पूर्ण ताकदीने शिवसेनेचा भगवा या तालुक्यात फडकवून शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याचा निर्धार ‘लाडक्या बहिणींनी’ केला असून, हा विजय महिलाच खेचून आणतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




