ताज्या बातम्या

उत्कृष्ट अभियंता अमोल मोहोळकर यांचा सन्मान; महामेट्रोच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाला राष्ट्रीय गौरव

पुणे(देवेंद्र भुजबळ) :

महामेट्रोतर्फे पुणे येथील स्वारगेट परिसरात उभारण्यात आलेल्या भूमिगत मेट्रो स्टेशन, पुणे राज्य परिवहन बस स्थानक, पीएमपीएमएल बस स्थानक, गणेश कला क्रीडा मंच तसेच इतर वाहतुकीला जोडणाऱ्या मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पाने शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना रस्त्यावर न येता भूमिगत सबवेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सहज व सुरक्षितपणे जाता येत आहे. याच ठिकाणी सुमारे एक लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचे भव्य व्यावसायिक बांधकामही उभारण्यात आले असून सर्व कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची ठरली आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटतर्फे महामेट्रो पुणे यांना “सर्वोत्कृष्ट काँक्रीट स्ट्रक्चर” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच पुणे येथील हॉटेल शेरटॉन ग्रँड येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक श्री. अमोल मोहोळकर यांनी स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी पिंपरी–स्वारगेट आणि वनाज–रामवाडी या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन झाले होते.
उत्कृष्ट अभियांत्रिकी कामगिरीसाठी श्री. मोहोळकर यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुणे–मुंबई एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यांच्या यशस्वी पूर्ततेबद्दल त्यांना कोकण रेल्वे एम.डी. अवॉर्ड, तर २००२ साली गंडक नदीवरील पुलासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते सन्मान मिळाला होता. सध्या ते महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पुण्यातील विविध एलिव्हेटेड व भूमिगत मेट्रो प्रकल्पांचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे मेट्रोची प्रगती दाखवताना त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top