ताज्या बातम्या

कराडातील बड्या व्यापाऱ्यावर इन्कम टॅक्सची धाड…. सहा ते सात अधिकाऱ्यांचा ठिय्या; दुकान, कागदपत्रांची तपासणी, व्यापारी व कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी

कराड (वार्ताहर) : शहरातील एका बड्या व्यापाऱ्यावर शनिवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकल्याने शहराच्या व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत दुकानाची झाडाझडती सुरू होती. याबाबात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

याबाबतची माहिती अशी की, शिवतीर्थ ते आझाद चौक दरम्यान असलेल्या एका नामांकित व्यावसायिकाच्या दुकानावर इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी धाड टाकली. या पथकात सहा ते सात वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सहभागी असून, त्यांनी सकाळपासून दुकानात ठिय्या मांडला होता. कारवाईदरम्यान दुकानातील आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध कागदपत्रे, खरेदी-विक्रीची नोंद, संगणक प्रणाली, ऑनलाइन व्यवहारांचे तपशील, तसेच इतर महत्त्वाच्या दस्तऐवजांची सखोल तपासणी करण्यात आली. ही तपासणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

तपासणीच्या वेळी संबंधित व्यापारी, तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांची इन्कम टॅक्स विभागाच्या

अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. दुकानातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर करभरणा टाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने ही कारवाई केल्याचे समजते.

दरम्यान, या धाडीमुळे कराडच्या बाजारपेठेत, तसेच अन्य दुकानदार व व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या कारवाईत नेमकी किती रकमेची करचुकवेगिरी झाली आहे, तसेच कोणकोणती कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, याबाबत इन्कम टॅक्स विभागाकडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top