कराड (वार्ताहर) : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी तातडीने कराड दौऱ्यावर येणार आहेत.
कराड येथील प्रीतिसंगमावर असलेली यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे पवार कुटुंबाचे श्रद्धास्थान व उर्जास्थळ मानले जाते. आपल्या दौऱ्याची सुरुवात सुनेत्रा पवार या प्रीतिसंगमावर अभिवादन करून करणार असून, नव्या राजकीय इनिंगची सुरुवात त्या याच पवित्र स्थळावरून करणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा त्यांचा प्रीतिसंगमावरील पहिलाच दौरा असणार आहे.
यानंतर त्या दिवंगत अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या भेटीतून त्या जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करणार असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्यामुळे कराडसह सातारा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात विशेष हालचालींना वेग आला असून, प्रीतिसंगमावरील पवार कुटुंबाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.




