तापोळा(नितीन गायकवाड) : तळदेव गट व गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जनसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद तळदेव गटातून माजी सभापती संजय गायकवाड तर पंचायत समिती गणातून संजय उत्तेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे.
मागील वीस वर्षांतील विकासकामांवर जनतेचा ठाम विश्वास असल्याने प्रत्येक गावागावांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी राहणारे कार्यकर्ते या पक्षाने घडवले असल्याने जनता कायम पक्षाच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील हे या भागातील शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब जनतेच्या अडचणींमध्ये नेहमीच सहभागी होत असल्याची जाणीव येथील जनतेला आहे. राजकारणापलीकडे जाऊन आबांचे जनतेवर असलेले प्रेम आणि आपुलकी महत्त्वाची असल्याचे मत पक्षाचे पदाधिकारी संतोष मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय देसाई व महादेव शिंदे यांनीही आपली भूमिका मांडताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय उत्तेकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन संधी दिली असून, या संधीचे सोने मतदानाच्या माध्यमातून करण्याचे आवाहन मतदारांना केले.
एकूणच तळदेव गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.




