ही स्पर्धा केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेत शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांना मातीच्या साहाय्याने ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, कल्पकता आणि सादरीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली दुर्गपरंपरेचे दर्शन घडविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी रु. ३०,०००, द्वितीय क्रमांकासाठीरु. २०,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. १०,०००अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी रु. २५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. २०,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. १०,००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय दोन्ही गटात उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. ५,००० ची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, नोंदणी संदर्भातील सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येईल. महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा जागर करण्याची आणि पुढील पिढीपर्यंत ऐतिहासिक वारसा पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘गडकिल्ले घडवूया – इतिहास जपूया’ असा गजर करीत स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.