वहाळ : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देत ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीतून स्थानिक विकासकामांना चालना मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसेवक रमेश तारेकर आणि प्रशासक संतोष ठोंबरे यांनी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी, गव्हाण भाजप मंडळाचे अध्यक्ष निलेश खारकर, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे यांनी भाजप सरकार सत्तेवर असल्याने भरघोस निधी उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावत नागरिकांना दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर यांनी जनतेला निवडणूकित दिलेल शब्द केवळ आश्वासने न राहता प्रत्यक्ष विकासकामांच्या रूपाने साकार होत असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामांसह सुरक्षा यंत्रणांसाठी आवश्यक उपकरणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जलनियोजन आणि जनजागृतीवर भर देत प्रशासनाकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्याचे कौतुक करून देशात मोदीजींचे सरकार राष्ट्र सेवेत उत्तम कार्य करत असल्याचे गौरव उदगार काढले . जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे प्रश्न सोडवावेत आणि विकासकामांचा पाठपुरावा करून जनतेचा विश्वास अधिक दृढ करावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
दरम्यान,गव्हाण भाजप मंडळाचे अध्यक्ष निलेश खारकर यांनी विरोधकांच्या होत असलेल्या सोशल मीडियावरील टीकेला प्रत्युत्तर देताना, “विरोधकांनी टोले लगावणे आणि संभ्रम निर्माण करणे एवढेच काम करावे; आम्ही विकास कार्य करू,” असा सडेतोड संदेश दिला. विकासकामांच्या श्रेयवादापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या खोचक राजकारणाला उत्तर देताना जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




