कुडाळ (अजित जगताप) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जावळी तालुक्यातील विकास सोसायटीच्या मतदारसंघात १ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. यापूर्वी दोन्ही बाजूने सोसायटी सभासद मतदारांना खुश करण्यासाठी सहली झाल्या. पण, आता ज्ञानेश्वराच्या ओवी नंतर काही सभासद मतदार विठ्ठलाचा नाम जप करत असल्याचे वृत्त हाती आली आहे. दरम्यान, बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर रांजणे यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यामध्ये संयमी व शांततेने चार गटात राजकारण निर्मळ गंगेसारखे वाहत होते. त्याला राजकीय महत्त्वकांक्षेपोटी नजर लागली आहे. सत्तेचा माज आणि वाममार्गाने मिळवलेल्या पैशाचे वाटेकरी यांचा संगम झाला आहे. त्यातून जावळी तालुक्यात एक पिढीचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्योग धंदा नाही. शेतीला पाणी मिळत नाही. दारूबंदीच्या तालुक्यात अनाधिकृत दारू विक्रेते व मटका व्यावसायिक स्वार्थापोटी रेडीमेड कार्यकर्ते बनले आहेत. जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या काही प्रामाणिक पोलिसांवरच कुरघोडी करण्याचा प्रकार होत आहे. अशा स्थितीमध्ये गेले काही दिवसापासून जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीचे सभासद मतदार ठरावाची चर्चा झाली. राजकीय पटलानंतर
शेतकऱ्यांचे ठराव घेण्यासाठी राडेबाजी जावळीकरांना अनुभवण्यास मिळाली. आनेवाडी सोसायटी सभासद मतदारासाठी अपहरण नाट्य घडले. पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण गेले. ज्यांचेवर आरोप झाले. त्यांना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. आखाडे गावात समर्थकांमध्ये आखाडा रंगला . आता चार दिवसांवर जिल्हा बँक संचालक निवडणूक मतदान प्रक्रिया आहे. दुधाने तोंड भाजले की, शहाणा माणूस ताक सुद्धा फुकून पितो. त्यामुळे फुकट शंभू बाबुराव कम ठेकेदार यांच्या झेड सुरक्षा खाली असलेल्या जावळी तालुक्यातील विकास सोसायटी काही सभासदांच्या सहलीचा उपभोग आता थांबवण्याची वेळ आलेली आहे. जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे विरुद्ध विठ्ठल गोळे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा मर्जीतील सभासदांसाठी सहलीचे नियोजन केले. विद्यमान संचालक ज्ञानेश्वर रांजणे यांनी यामध्ये आघाडी घेतली असली तरी त्यांच्याकडे ३८ ठराव होते. श्री विठ्ठल गोळे यांच्या वतीने शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात १० ठराव आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले होते. परंतु, पुणे विभाग पदवीधर मतदार संघात भाजपला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच श्री. रांजणे यांच्याकडे असलेले चार ठरावाचे सभासद सध्या ज्ञानेश्वर ओवी विसरून विठ्ठल नामाचा जप करत असल्याची बाब सहकार क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चेत आली आहे. हे चार भाग्यवान की कम नशिबी सभासद मतदार कोण आहेत? याची सूक्ष्म पद्धतीने तपासणी सुरू झालेली आहे. घर का भेदी.. लंका दहन.. हे रामायण कथेत वाचले होते. आता गद्दारीचा जमाना असल्यामुळे राजकीय वाशिंग मशीनला चांगलेच मार्केट आले आहे. असे काही घडले तर गावच्या सोसायटी व शेतकरी सभासदांच्या हितासाठी निर्णय घेतला. असे सांगण्यासाठी ते विसरणार नाहीत. यातच खरी मेख आहे. सहलीच्या निमित्ताने काही सभासदांचे लाड पुरवून सुद्धा आता त्यांच्या बदलत्या राजकीय घडामोडीमुळे अपेक्षा वाढीस लागलेले आहेत. भिंतीवरील पाल आता डायनासोरचे रूप घेऊ लागली आहे. आसमान से गिरे और खजूर मे अटके.. अशी अवस्था दिसत आहे.
निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून सोसायट्यांचे ठराव गोळा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान जावळीमध्ये आमदार शशिकांत शिंदे समर्थक व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद व राडा झाला होता. काही ठिकाणी दिल जमाई झाली . शांत व संयमी जावळी तालुक्यात वर्चस्ववाद भारी पडत आहे. ‘साम, दाम, दंड, भेद’ नीती वापरल्याचा दोन्हीकडून आरोप केला जात होता. जावळी तालुक्यातील एकूण ४९ पैकी ४८ सोसायट्यांचे मतदार निश्चित झाले आहेत. मतदाना दिवशीच मत फुटू नये. म्हणून मोठी खबरदारी घेतली जाणार आहे. सुमारे ३२ ते ३८ ठरावधारकांना सुरुवातीलाच सहलीवर घेऊन गेले. त्यापैकी काही जण माघारी आले. जे सहलीसाठी थांबले आहेत. त्यांच्या निग्रणीसाठी सांगकामे कम ठेकेदार काही राजकीय दलाल सुद्धा मजा मारत आहेत. ही बाब सुद्धा जावळीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. घरदार सोडून पर प्रांतात सहलीला गेलेले काही मतदार व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सुद्धा सणासुदीला घरी येऊ शकले नाहीत. त्यांना ओलीस असल्याची जाणीव झाली आहे. त्यांच्या मनाची दोलाई मनस्थिती उघड होत आहे.
मागील निवडणुकीतील नाट्यमय घडामोडी पाहता मतदाना दिवशी मतदान केंद्राबाहेर बिदागी बहादूरांची मोठा फौज फाटा जमणार आहे.
सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ जागा बिनविरोध झाल्या असून, जावळीसह उर्वरित १२ जागांसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचेच चेले निवडणुकीतील पराभवाचा अनुभव असून सुद्धा विठ्ठल गोळे हे आता सेनापतीची लढाई स्वतः लढत आहेत. जावळी तालुक्यापेक्षा काकणभर जास्त कोरेगाव तालुक्यात त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने त्यांच्या बाजूने जावळी तालुक्यातील सोसायटी मतदारांच्या ठरावाची संख्या कमी आहे. यामध्ये भर पडण्याची सुताराम शक्यता नसल्याचे श्री. ज्ञानेश्वर रांजणे यांच्या समर्थकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.





