
तापोळा(नितीन गायकवाड) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत तळदेव गट व गणातील लढत ऐतिहासिक ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तळदेव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते सुभाषदादा सोंडकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दाखल करत शिवसेना व राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
त्याचप्रमाणे तळदेव गणातही भाजपचा सक्षम उमेदवार रिंगणात उतरल्याने येथील लढत चुरशीची होणार यात तीळमात्र शंका नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचा कट्टर गड मानल्या जाणाऱ्या वेंगळे गावचे माजी सरपंच गोविंद शेठ संकपाळ यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी दाखल केली. सुरुवातीला या उमेदवारांकडे शिवसेना व राष्ट्रवादीकडून दुर्लक्ष झाले, मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे चित्र वेगाने पालटत आहे.
राज्याचे मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले व मंत्री जयकुमार गोरे यांच्या तळदेव येथे झालेल्या विराट सभेनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाडा येथील सभेनंतर थेट तळदेवमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप उमेदवारांना ठाम पाठिंबा दिला.
आपल्या भाषणात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, भाजप हा राज्यातील क्रमांक एक पक्ष असून केंद्र व राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे तळदेव गट-गणात कमळ फुलवायचे असून विकासनिधीला कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांनी उमेदवारांना व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देत प्रचाराला गती दिली.
याचवेळी पक्षाने सुनील तांबे व सागर संकपाळ यांच्यावर तळदेव गणाची प्रमुख जबाबदारी सोपवत युवकांना संधी दिल्याचेही त्यांनी नमूद केले. “या संधीचे सोने करा आणि येथील हुकूमशाही मोडीत काढा,” असे मार्गदर्शन मंत्री महोदयांनी केले.
एकूणच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सभेनंतर तळदेव गट व गणातून भाजपचे ‘कमळ’ फुलणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होत चालली आहे.




