सातारा(अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने बलाढ्य समजणाऱ्या भाजप महायुतीचा दोन ठिकाणी दणदणीत पराभव केला आहे. ही ऐतिहासिक घटना ठरली असून नेत्याविना सेनापतीने चांगलेच घवघवीत यश संपादन केले आहे. राजकीय पटलावर १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला झाला होता. त्यानंतर महत्वकांक्षेमुळे काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केला. परंतु, लढाऊ योद्धा व माथाडी कामगार नेते माजी मंत्रीशशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच काम करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही सत्ता नसतानाही तळागाळात निस्वार्थीपणाने काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाच्या टॉनिक मुळे इतिहास घडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे व महिला अध्यक्ष समिंदराताई जाधव, सरचिटणीस राजकुमार पाटील, वैशाली जाधव, जयश्री पाटील, नलिनी जाधव, सुनील काळेकर, अतुल शिंदे, नितीन शिंदे, प्रवीण धसके, शफिक शेख, प्रज्ञा गायकवाड, गोरख नलवडे, तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची मोलाची साथ लाभली. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज नगर व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व छत्रपती शिवाजी महाराज नगर या दोन्ही ठिकाणी विधान परिषदेच्या पदवी मतदारसंघातील जागा जिंकून दाखवली आहे. संकटाचे काळे ढग दूर करून स्वच्छ प्रकाश आता राष्ट्रवादीला अधिक गतिमान करणार आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रात दोन हजार किलोमीटरचे प्रवास करून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या गेवराई, धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी झंझावती दौरे केले. सामान्य माणसांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विश्वास दाखवून तुतारी फुंकली होती. विरोधकांनी हिंदू मुस्लिम, तरुण आंदोलकांवर लाठीमार , महागाई ,वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार हे सत्य मुद्दे प्रभावीपणाने मांडले. त्यामुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये मतदारांनी निर्भीडपणाने मत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले आहे. ८४ वर्षाच्या ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकजुटीने काम केले. सातारा जिल्ह्यात चार मंत्री व चार आमदार महायुतीचे असूनही सामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला आहे. सामान्यांना अपेक्षित निकाल लागल्यामुळे सातारा जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. राजकारणामुळे सत्ता नसतानाही तत्त्वनिष्ठ राजकारण यश मिळवून देऊ शकतो. असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे.. जखमी वाघाने भाजपचीच शिकार केल्याची चर्चा रंगू लागली आहे. देशभरातील प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर साताऱ्यात पेढे वाटत होते. काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच भाजप गोठा मध्ये शोककळा पसरली होती. पावसाळ्याच्या बोसभा मध्ये परतीचा पाऊस असतो तशा पद्धतीने आता भाजपच्या सत्तेपासून परतण्याची वेळ आल्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे . …………………………………… फोटो- शशिकांत शिंदे




