कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी मंत्री विलास काका उंडाळकर यांचे पुतणे आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत येळगाव–उंडाळे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली.
या निर्णयामुळे येळगाव जिल्हा परिषद गटात थेट बंधूविरोधी लढत रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयासिंह पाटील उंडाळकर आणि भाजप पुरस्कृत उमेदवार राजाभाऊ पाटील उंडाळकर आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल बाबा भोसले म्हणाले की, कराड दक्षिणच्या राजकारणाच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) साठी प्रामाणिकपणे काम करूनही राजाभाऊ पाटील उंडाळकर यांचा विचार झाला नाही. स्वर्गीय जयसिंग पाटील बापूंच्या कार्याचा वारसा लाभलेल्या राजाभाऊंनी कार्यकर्त्यांच्या आणि परिसरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले की, येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राजाभाऊ पाटील उंडाळकर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. तसेच सवादे गणातून संजय शेवाळे पंचायत समितीची निवडणूक भाजपकडून लढवत असून संगीता ताई शेटे देखील भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. आम्ही सर्वजण अनेक दिवसांपासून सामाजिक व राजकीय पातळीवर एकत्रितपणे काम करत आहोत.
आमदार भोसले यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणारे सदस्य हे आदरणीय राजाभाऊ पाटील उंडाळकरच असतील. जनतेमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना असून या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.




