महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर तालुक्यातील पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या बौद्ध समाजाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मकरंद पाटील यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या विकासाला साथ देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
या भूमिकेमुळे महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी व सेनेचा विजय सोपा झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मायभूमीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामे सुरू केलेली आहेत. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून बौद्ध समाजव्यतिरिक्त सर्व दलित, कष्टकरी, सामान्य माणसांना केंद्रबिंदू म्हणून विकास कामांमध्ये सहभागी करून घेतले आहे. विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने पुरोगामी चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या बौद्ध समाजाने सध्याच्या जिरवा-जिरवीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या कार्यासाठी साथ आणि जातीवादी प्रवृत्तीला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.
कोयना विभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास या भूमिकेतून महाबळेश्वर तालुक्यातील निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान वरिष्ठांच्या माध्यमातून दिलेले शब्द व विकासकामांना गती देण्याचे आश्वासन काटेकोरपणे पाळले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात उमेदवार संजय भालेराव व सिद्धार्थ यादव यांनी दोन्ही सत्ताधारी मंत्री महोदयांनी या सुशिक्षित व एकजुट समाजावर कोणताही अन्याय न करता दिलेला शब्द पाळून योग्य तो न्याय द्यावा. असे आवाहन महाबळेश्वर तालुक्यातील बौद्ध समाजातील लोकांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शिवसेना व राष्ट्रवादी मार्गक्रमण करत आहेत. राजकारणासोबत समाजकारणालाही महत्त्व दिले आहे. बौद्ध समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना यापुढेही प्रयत्न करणार आहेत.
बौद्ध समाजाने सातारा जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना व राष्ट्रवादीसोबत सन्मान राखला जाईल. यासाठी सोबत राहण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. काहींना बौद्ध समाजाची उमेदवारी चालत नाही. मात्र, मते चालतात. हे थांबवण्यासाठी भाजपला रोखणे गरजेचे आहे. असे सर्व समाज माध्यमातून मागणी होऊ लागलेली आहे. बौद्ध समाजाला जाणीवपूर्वक सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्य सेनेत राहून भाजपला मदत करत आहेत. सातारा जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. याबाबतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावी असे स्पष्ट करण्यात आले.
या निमित्त जातीयवादी प्रवृत्तीला मतदानातून धडा शिकवण्यासाठी बौद्ध कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक मतदान करावी. अशी ठाम मागणी उपस्थित समाजबांधवांनी केली आहे. राजकीय तडजोडी शिवाय सत्तेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे भावनिक कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या समाज बांधवांच्या विकासाची नाळ कायम जोडण्यासाठी प्रयत्न करावा. असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील पुरेगामी चळवळीत काम करणारे तसेच बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांनीही याबाबत ठोस भूमिका घेतल्याचे माहिती देण्यात आली आहे.
_____________________




