प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26 करीता दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वा. पासून मतदानास प्रारंभ झाला. नवी मुंबईत 191 ठिकाणी असलेल्या 1148 मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साही प्रतिसाद दिसून आला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून मतदान प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार अधिकच्या सुविधा पुरविण्याबाबत त्यांनी केलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. आयुक्तांनी रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ या मतदान केंद्रावर सपत्निक जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत 8.18 %, सकाळी 11.30 वा. पर्यंत 19.68 %, दुपारी 1.30 वा. पर्यंत 33.26 % आणि दुपारी 3.30 वा. पर्यंत 45.51 % इतके मतदान झाले होते. यापूर्वी झालेल्या सन 2015 मधील निवडणूकीत एकूण 48.35% या तुलनेत यावेळी मतदारांचा अधिक उत्तम प्रतिसाद मतदानासाठी लाभलेला दिसला.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रथमत:च बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असल्याने व त्यामध्ये एका मतदारास 4 मते दयावयाची असल्याने त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर 800 ते 850 मतदार असतील अशाप्रकारे मतदान यादीचे भाग करण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी एका मतदारास एकच मत दयावयाचे असल्याने एका मतदान केंद्रावर 1000 ते 1100 मतदार संख्या ठेवण्यात आली होती. ती यावेळी महानगरपालिका निवडणूकीत बहुसदस्यीय मतदान असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर 800 ते 850 इतकी कमी करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेच्या वेळी ज्या मतदान केंद्रावर मतदान केले होते त्यापेक्षा यावेळी अनेक मतदारांचे नाव वेगळया मतदान केंद्रावर होते.
त्याकरिता महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच बीएलओ मार्फत मतदान चिठ्ठ्या वाटण्यात आल्या होत्या. तरीही नागरिकांना अधिक सोयीचे व्हावे यादृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रस्थळी बीएलओ यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याक्षणी तेथील क्षेत्रीय अधिकारी यांचेमार्फत त्वरित कार्यवाही करून नवीन यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली.
आयुक्तांप्रमाणेच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनीही शहरातील विविध भागात असलेल्या मतदान केंद्रांना भेटी देऊन नागरिकांना तेथील व्यवस्थेची पाहणी केली व आवश्यक सुधारणा करून घेतल्या.
निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे तसेच निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनंजय सावळकर यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.
180 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मंडपातील मतदान केंद्रावरही चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मैदान वा पटांगण शेजारी असलेल्या केंद्रांबाहेर नागरिकांना सावलीसाठी मंडप टाकण्यात आले होते.
केंद्रांच्या ठिकाणी बैठक व्यवस्था, पिण्याची पाणी व्यवस्था, प्रसाधनगृहे व्यवस्था, वैद्यकिय पथक, इमर्जन्सी मेडिसीन किट, व्हिलचेअर अशा सुविधा पुरविण्यात आलेल्या होत्या.
प्रत्येक विभागामध्ये एक याप्रमाणे प्रत्येकी आठ महिला स्पेशल – सखी मतदान केंद्र (पिंक बूथ) तसेच आठ पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) बनविण्यात आले होते. मतदारांकडून त्या संकल्पनेची प्रशंसा करण्यात आली.
मतदारांना सहाय्यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते. दिव्यांग, वयोवृध्द नागरिक, गरोदर महिला यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले. तान्हे बाळ व लहान मुलांसाठी नियुक्त आशा स्वयंसेविका यांनीही मदतीची भूमिका बजावली.
दिव्यांग व वयोवृध्द मतदारांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केलेली आहे.
विशेष म्हणजे मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास मनाई असल्याने चुकून मोबाईल सोबत आणला असल्यास तो बाहेर ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर मोबाईल लॉकर पाऊच व्यवस्था करण्यात आलेली होती.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. मतदान केंद्रे व परिसर 1250 सीसीटिव्हीव्दारे सुरक्षित ठेवून त्यावर महानगरपालिका मुख्यालय, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस आयुक्तालय येथून थेट देखरेख ठेवण्यात आलेली होती. सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता 14 जानेवारी रोजी रात्री राहण्यासाठी निवास व्यवस्था करण्यात आली होती व रात्र निवा-याच्या ठिकाणी फॉगींग करण्यात आले होते.
दि. 16 जानेवारी रोजी या आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी स्वतंत्र मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झालेले आहे. आयुक्तांनी या पाहणीमध्ये आगरी कोळी संस्कृति भवन नेरूळ याठिकाणी होणा-या मतमोजणी केंद्राची व तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका निवडणूक पारदर्शक व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेण्यात आलेली होती. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे प्रत्येक बाबीकडे व्यक्तिश: बारकाईने लक्ष होते. आजही सकाळपासून आयुक्तांनी स्वत: सर्व विभागांमध्ये पाहणी करीत व नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडेल याकडे विशेष लक्ष दिले. नमुंमपा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडले असून नवी मुंबई मतदारांनीही उत्साहाने प्रतिसाद दिल्याचे चित्र सर्वच विभागांमध्ये पहायला मिळाले.




