महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : आमशी गावचे माजी सरपंच तथा युवा नेतृत्व भाऊ मोरे यांनी तळदेव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्याकडून मिळालेल्या राजकीय शिकवणुकीतून समाजसेवेची प्रेरणा घेत, जननायक आमदार व मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा संकल्प मोरे यांनी व्यक्त केला आहे.
सहकाररत्न सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजूशेठ राजपुरे, माजी सभापती संजय गायकवाड यांसारख्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली राजकीय दिशा व सर्वसामान्य जनतेचा विश्वास यामुळेच लहान वयात आमशी गावाने दिलेले सरपंचपद ही आपल्या कार्याची पोहोचपावती असल्याचे मोरे यांनी सांगितले. समाजसेवा व राजकारण यांची सांगड घातल्यास विकासकामांना अधिक न्याय देता येतो, या भूमिकेतूनच आपण सक्रिय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
युवा उद्योजक, युवकांचे प्रेरणास्थान आणि प्रभावी युवा नेतृत्व अशी ओळख असलेले भाऊ मोरे मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्याच्या तयारीत आहेत. तळदेव गणात मंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि आपला मजबूत जनसंपर्क याच जोरावर उमेदवारीची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेदवारी मिळाल्यास मिळालेल्या संधीचे सोने करू, असा विश्वास व्यक्त करताना अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा मान्य असेल, असे मत महालक्ष्मी मोबाईल शॉपीचे मालक निलेश मोरे यांनी व्यक्त केले आहे.




