ताज्या बातम्या

कोपरखैरणे विभागात मतदारांना आमिषे दाखवण्याचे प्रकार वाढले;  कडक कारवाईची मागणी

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे विभागात मतदारांना आमिषे दाखवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. साडी, दारूच्या बाटल्या, रोख रक्कम अशा विविध स्वरूपांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. लोकशाहीसाठी घातक असलेल्या या प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि काही उमेदवार मत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्रास आमिषे दाखवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र जागरूक मतदारांनी अशा प्रकारांना बळी न पडता आपले मत विकासासाठी आणि प्रामाणिक नेतृत्वासाठी वापरावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की साडी, भांडी किंवा दारू यांसारख्या वस्तूंमुळे मत विकण्याची गरज नाही. “घरातील गरजा या आपल्या मेहनतीतून भागवता येतात; क्षणिक फायद्यासाठी मतदान विकणे म्हणजे आपल्या भविष्यातील विकासावर घाला घालणे,” अशी भूमिका अनेक मतदार व्यक्त करत आहेत. जो उमेदवार खरोखरच आपल्या सुख-दुःखात धावून येतो, अडचणी सोडवतो, त्यालाच मत द्यावे, असे मत प्रबळ होत आहे.
याशिवाय काही उमेदवारांवर गुंडशाही प्रवृत्तीचे, खंडणी, महिलांची छेडछाड व इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असल्याचीही चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर मतदारांनी उमेदवाराची पार्श्वभूमी, शिक्षण, सामाजिक काम, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी काम करण्याची क्षमता या सर्व बाबींचा सखोल विचार करूनच मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकारांकडे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही जागरूक मतदारांकडून केला जात असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे ते सांगतात. लोकशाही अधिक बळकट करायची असेल तर मतदारांना आमिषे दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. नियमांनुसार अशा कृत्यांत सहभागी असलेल्या उमेदवारांवर दंडात्मक कारवाई करून गरज भासल्यास उमेदवारी रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत आहे.
तसेच नवी मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाने या प्रकारांवर बारकाईने नजर ठेवून त्वरित हस्तक्षेप करावा, अशी विनंती जागरूक मतदारांनी केली आहे. कोणाचे पैसे किंवा वस्तू स्वीकारून मतदान न करता, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top