ताज्या बातम्या

नवीन वर्षातही मध्य रेल्वेचा प्रवास ठप्प; नऊ दिवसांपासून प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप

मुंबई(भिमराव धुळप) : मुंबईकरांची ‘जीवनदायिनी’ म्हणून ओळखली जाणारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाईन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. नवीन वर्ष सुरू होऊन आज नऊ दिवस झाले असतानाही मध्य रेल्वेच्या सेंट्रल, हार्बर तसेच ट्रान्स हार्बर लाईनवर सातत्याने गाड्या उशिराने धावत आहेत.
पाच, दहा, पंधरा मिनिटांपासून ते थेट अर्धा-अर्धा तास गाड्या उशिराने येत असल्याने संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी दररोज लाखो रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, विशेषतः नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पनवेल–सीएसटी, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाड्या अत्यंत संथ गतीने धावत असून एकही रेल्वे वेळेत येत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.
या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून योग्य आणि वेळेवर सूचना (अनाउन्समेंट) दिल्या जात नाहीत. एखाद-दुसऱ्या वेळेस “गाडी पाच मिनिटे उशिरा” अशी कोरडी घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्षात विलंब २० ते ३० मिनिटांचा असतो. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
आज, ९ जानेवारी रोजी दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकात सुमारे दोन वाजल्यापासून सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद लोकल तब्बल अर्धा तास उपलब्ध नव्हती. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर जवळपास ४० मिनिटे गाडी न आल्याची प्रत्यक्ष परिस्थिती होती. ही अवस्था एखाद्या सामान्य प्रवाशाचीच नव्हे, तर एका पत्रकारालाही अनुभवावी लागली, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
प्रवासी रेल्वेचा प्रवास मोफत करत नाहीत. कामावर वेळेत पोहोचणे, वैयक्तिक अडचणी, आरोग्यविषयक कारणे अशा अनेक गरजांसाठी लोक रेल्वेवर अवलंबून असतात. मात्र सध्याचा बेफिकीर कारभार आणि सततचा विलंब प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहत आहे.
या गंभीर परिस्थितीची रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, गाड्या वेळेवर सोडण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांना अचूक व वेळेवर माहिती देण्यात यावी, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top