
दादर : दादर–माहीम महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्याने अंतिम निर्णय मनसेच्या अधिकृत उमेदवार म्हणून यशवंत किल्लेदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
“ठाकरे यांचे शिलेदार यशवंत किल्लेदार” या घोषणांनी सध्या दादर–माहीम परिसरात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. या प्रभागातून मागील निवडणुकीत विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या सौ. प्रीती प्रकाश पाटणकर यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली. तसेच सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत कार्यरत असलेले स्नेहल आणि सुधीर जाधव हे दांपत्यही नाराजीनंतर शिंदे गटात सहभागी झाले.
या घडामोडींमुळे प्रभाग ९२ मध्ये खऱ्या अर्थाने दुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असला तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोणती ‘सेना’ बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यशवंत किल्लेदार यांनी संपूर्ण प्रभागात आक्रमक प्रचार सुरू केला असून, जागोजागी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
प्रचार रॅलींमध्ये असंख्य पदाधिकारी सहभागी होत असून, आमदार महेश सावंत,माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांच्यासह अनेक मनसे सेनेचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती लाभत आहे. त्यामुळे या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच यशवंत किल्लेदार यांना मिळणारा वाढता जनसमर्थन हा या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




