मुंबई – राज्यात वाचन चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंत दररोज फक्त वाचनासाठी एक स्वतंत्र तासिका ठेवण्यात यावी, अशी शिफारस राज्य शासनाकडे करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार व धारावीतील महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हल्लीच्या पिढीमध्ये वाचनाची आवड लक्षणीयरीत्या कमी होत चालली असून सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना नीट वाचन करता येत नाही, ही गंभीर बाब असल्याचे माने यांनी पत्रात नमूद केले आहे. वाचन हा ज्ञानशक्तीचा पाया असून तो भक्कम झाला, तरच मुले पुस्तके, वृत्तपत्रे व ग्रंथ वाचण्याकडे प्रवृत्त होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाचनवृद्धी चळवळ प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात यावी, अशी विनंतीही माने यांनी केली आहे.
इयत्ता पहिली ते नववीमध्ये दररोज किमान आठ ते दहा विद्यार्थ्यांचे मोठ्याने वाचन झाल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि वाचनाची गोडी लागेल. यासाठी संमेलनाध्यक्ष या नात्याने राज्य सरकार, मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना ठोस सूचना कराव्यात, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
साहित्यिक, संपादक व पत्रकारांचा खरा आश्रयदाता वाचकच असतो. त्यामुळे वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्व छोटे-मोठे साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार व संपादकांनी मनापासून योगदान देणे आवश्यक आहे. चांगले वाचक घडले, तर आपोआपच पुस्तकांचा व वृत्तपत्रांचा खप वाढेल. यासाठी शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत बाबुराव माने यांनी व्यक्त केले आहे.




