ताज्या बातम्या

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई : धारावी परिसरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून, गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा त्याग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

धारावीतील हे सर्व कार्यकर्ते मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, सातत्याने निष्ठा राखूनही स्थानिक कार्यकर्त्यांना संधी न दिल्याची भावना त्यांच्या मनात होती. यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीला उमेदवारी

दिल्यापासूनच पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही अनेकांनी पक्षशिस्त पाळत त्यांना साथ दिली होती.

आता महापालिका निवडणुकीत “आता नाही तर कधीच नाही” या भावनेतून इच्छुक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने विविध उपक्रम राबवले. मात्र तरीही उमेदवारी नाकारल्याने संताप अनावर झाला. भविष्यातही संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने वार्ड अध्यक्षांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवलिंग व्हटकर, विनायक पोळ, महेश तावरे, विकी व्हटकर, सुरेश मोगल आदींनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला.
या सामूहिक पक्षांतरामुळे धारावीत वर्षा गायकवाड यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान मिळाले असून, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागेल, यात शंका नाही.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top