ताज्या बातम्या

लोककला हीच आपली खरी ओळख, तिचे जतन आवश्यक : पंढरीनाथ कांबळे यांचे प्रतिपादन

मुंबई (खंडुराज गायकवाड) : महाराष्ट्राच्या मातीतील लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा असलेल्या तमाशा या लोककलेच्या संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत दहा दिवसीय तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. भावी पिढीपर्यंत तमाशा या लोककलेचे शास्त्रशुद्ध व पारंपरिक ज्ञान पोहोचावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग दरवर्षी राज्यातील विविध भागांत अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करीत आहे. लोककला अकादमीच्या सहकार्याने यंदा कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात ३ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर होत आहे. उद्घाटन सोहोळ्याची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली. शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना तमाशा कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण तसेच परंपरेने चालत आलेल्या सादरीकरण पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व अभ्यासक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार असल्याची माहिती शिबिराचे संचालक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.
लोककला ही आपली मूळ ओळख असून तिची जोपासना केली, तरच ती पुढील पिढीपर्यंत जिवंत राहील, असे मत उद्घाटक पंढरीनाथ कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी आपल्या भारदस्त आवाजात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या नाट्य विभागाचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड, लोककलेचे अभ्यासक व राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते खंडूराज गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोककला अकादमीचे सहप्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे व मोनिका ठक्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top