मुंबई : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार कालावधी १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असून, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक असून, सूचक व अनुमोदकाचे नाव उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्या प्रभागातील मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक असतो.
उमेदवारास एकापेक्षा जास्त प्रभागांतून नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल, मात्र एका प्रभागातील एकाच जागेसाठीच निवडणूक लढविता येईल. तसेच, एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.




