सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळी संपली असून निकाल जाहीर झाले आहेत. आता नवीन नगरपालिका सर्वसाधारण सभेची सुरुवात नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होणार अशी खात्रीलायक माहिती समजली आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नगराध्यक्ष पदावर भाजपचे अमोल मोहिते यांची वर्णी लागली आहे. अद्याप अधिकृत राजपत्रित प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणार आहे. २५ दिवसाच्या कालावधीमध्ये केव्हाही सर्वसाधारण सभा घेता येते. यामध्ये अधिकृत नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर उपनगराध्यक्ष व विविध समितीच्या सभापतीची निवड होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावण्यात येत आहे. सध्या भाजप मध्ये सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांचे विलीनीकरण होऊन मनोमिलन झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार नगराध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक नगराध्यक्ष अमोल मोहिते होणार आहेत व उपनगराध्यक्ष पदावर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अपक्षांनी समर्थन दिल्यामुळे सध्या तरी उपनगराध्यक्ष व विविध समिती सभापती पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक डी.जी. बनकर, निशांत पाटील, सागर पावशे, आशा पंडित,मनोज शेंडे, सिद्धी पवार ,मयूर कांबळे व अक्षय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे.
सातारा नगरपालिकेचा इतिहास हा मराठा साम्राज्याच्या राजधानी म्हणून परिचित आहे. १ एप्रिल १८८५ रोजी सातारा नगरपालिकेची स्थापना झाली .प्राथमिक शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या सेवा सुरू झाल्या, ज्यामुळे शहराच्या प्रशासनाचा पाया रचला गेला आणि आज हे शहर एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित झाले आहे. सातारा नगरपालिका हद्य वाढ झाल्यामुळे विकास कामे गतीने करावी लागणार आहेत.
१९९४ नुसार सातारा नगरपरिषदेत निवडून येणा-या सदस्यांची संख्या ३४ होती . ती सातारा शहराच्या हद्द वाढीमुळे पन्नास पर्यंत पोहचलेली.लोकसंख्येच्या वाढीव निर्बंधामुळे ती आता ब वर्गात मोडत आहे.
भाजपचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी अपक्ष व भाजपमधून २२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १९ उमेदवार विजयी झाले. आता यामध्ये पाच अपक्ष आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराची भर पडली आहे. याशिवाय, प्रभाग २१ मधून बिनविरोध निवडून आलेल्या आशा पंडित, प्रभाग २५ मधील सिद्धी पवार आणि तर प्रभाग २४ मधील शुभांगी काटवटे यांनीही त्यांनाच समर्थन दिले आहे. या सर्व घडामोडींमुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाची सदस्य संख्या आता २८ झाली आहे . सातारा पालिकेतील त्यांची पकड अधिक मजबूत झाली आहे. अपक्ष नगरसेवक सागर पावसे हेदेखील श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थन करत आहे. ते खऱ्या अर्थाने जॉईंट किलर ठरल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची त्यांचे समर्थक जोरदार चर्चा करत आहेत.
सातारा नगरपालिकेत निवडून आलेले अपक्ष नगरसेवक प्रशांत आहेरराव, सावित्री बडेकर, विनोद मोरे, मयूर कांबळे, जयश्री जाधव, संकेत साठे (शिवसेना) यांनी समर्थन दिल्यामुळे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष व विविध विषय समितीच्या सभापती पदासाठी त्यांच्याच पारडे जड राहणारे हे निश्चित झाले आहे. सन २०२६ च्या जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ५ जानेवारीच्या अगोदरच सर्वसाधारण सभा बाबतची नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व साधारण सभा होईल. यासाठी सातारा नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. राजपत्रित जाहीर झाल्यानंतर नगरपालिकेचे कामकाज सुरू होणार आणि पुढील तीन महिन्यातच नवीन इमारतीमध्ये नगरपालिकेचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका मुख्यधिकारी विनोद जळक व काही अधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात नवीन नगरसेवकांनी चर्चा करून काही नवीन नगरसेवकांनी प्रमाणपत्र घेतले व कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी पत्रकार उपस्थित होते._________________________________फोटो– सातारा नगरपालिका इमारत व नवीन नगरसेवक (छाया- अजित जगताप सातारा)




