मुंबई(खंडुराज गायकवाड) : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये नुकतेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले.यावर्षी खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा आनंद मिळाला. खूप वर्षानंतर अशी हुडहुडी भरणारी थंडी या संत्रा नगरीत अनुभवयाला मिळाली. एक राजकीय पत्रकार म्हणून जरी दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी जात असलो तरी तेथील ग्रामीण भागातील लोककलावंतांच्या भेटीगाठी करून त्यांचे प्रश्न समजावून घेणे ही आपली सांस्कृतिक बांधिलकी विसरता येत नाही. अन ती बांधिलकी ही स्वस्थ बसून देत नाही.
म्हणूनच वर्षातून एकदा नागपुरात अधिवेशनाला गेलो की, विधानभवन इमारतीच्या मागील बाजूस ‘अभिरक्षक’ मध्यवर्ती संग्रहालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाला आवर्जून भेट ठरलेली असते.
सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची पुणे,संभाजी नगर,आणि नागपूर या तीन ठिकाणी विभागीय कार्यालयं आहेत. नाशिक,अमरावती, येथे अद्याप विभागीय कार्यालय सुरू झालेली नाहीत.केव्हा तरी यथावकाश सुरू होतील अशी अपेक्षा आपण ठेवू या..!
1) सहाय्यक संचालक,( एक पद) 2) कार्यक्रम अधिकारी (एक पद ) 3) अधीक्षक (एक पद ) 4) सहाय्यक लेखाधिकारी (एक पद ) 5)लिपिक (एक पद ) 6) एक शिपाई 7)वाहन चालक असा प्रत्येक सांस्कृतिक संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाला आकृतीबंधानुसार अधिकारी /कर्मचारी वर्ग देण्याचा निर्णय साधारणपणे 2013-2014 सालच्या दरम्यान झाला होता.त्यानुसार नागपूर आणि संभाजी नगर आणि पुणे येथील विभागीय कार्यालयाला येवढा स्टाफ देणे गरजेचे होते.कारण एका कार्यालयाला चार ते पाच जिल्ह्याचा कारभार बघायचा असतो.
मात्र जेव्हा विधिमंडळ अधिवेशन काळात नागपूरच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विभागीय कार्यलयाला सदिच्छा भेट दिली तेव्हा जे दोन – तीन वर्षांपासून पहात आलोय,तेच कार्यालयाचे रूपडं जसाच्या तसं आहे.
एक छोटसं दालन,त्या दालनात दोन टेबल एकमेकांना जणू काय घट्ट मिठी मारून बसलेले आहेत.त्याच टेबलाच्या आजूबाजूला तीन चार खुर्च्या लावलेल्या आहेत. त्याच एका टेबलावर अमरावती आणि नागपूर विभागाअंतर्गत असलेल्या एकूण अकरा जिल्ह्याचा कारभार चालतो. त्या खुर्च्या म्हणजे संगीत खुर्ची वाटते.एक उठला की,दुसरा बसतो.बाहेरून कोण कलावंत आला तर त्याला बसायला काय उभे राहायला सुद्धा जागा नाही.त्या दालनात एका वेळी एकच कलावंत जावून शकतो.अजून एकदोन आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्न केला तर चेंजराचेंगारी होईल.येवढं दाटीवाटीत हे कार्यालय आहे.अधिकारी आणि कर्मचारी एकाच टेबलावर जेवायला बसतात.इथँ कोण साहेब आणि कोणी कर्मचारी हेच आलेल्या लोकांना लवकर कळत नाही.
खरं तर ही संपूर्ण इमारत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व संचालनालयाच्या ताब्यात आहेत.या इमारतीमध्ये भरपूर जागा आहेत.पण ज्यांच्या ताब्यात ही इमारत आहे.ते अधिकारी या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सौजन्यांची वागणूक देत नाही.जसे काय आपले अधिकारी पोट भाडेकरू म्हणून राहतात की काय असा प्रश्न ही अवस्था डोळ्यांनी पाहिल्यावर पडतो.
संभाजी नगर येथील ही कार्यालयाची अवस्था वेगळी नाही. मुंबईचे अधिकारी हे कार्यालय उघडायला जातात.अशी तेथील कलावंतांची तक्रार असते. तेथील तर कार्यालयात एखाद्या दुकानाला शटर असते असे आहेत.एकाही विभागीय कार्यालयाला संपूर्ण स्टाफ नाही.केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरते ही कार्यालये उघडली आहेत. कामाचं विकेंद्रिकारण अजून का झाले नाही.हे एक पडलेले कोडं आहे. आज सांस्कृतिक कार्य संचालनालयाची सर्व विभागीय कार्यालये म्हणजे ग्रामीण भागातील पोस्ट खात्याची ‘टपाल कार्यालय’ वाटतात.
ज्यामध्ये मोहक अशी संस्कृती आणि सांस्कृतिक शब्द असतात. ती कार्यालये अंतरंग आणि बाह्यरंग किती सुंदर असली पाहिजे याची साधी कल्पना केली तरी सांस्कृतिक खात्याचे कुठे चुकते. हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
खंडूराज गायकवाड
khandurajgkwd @gmail.com
(लेखक मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार असून लोककला अभ्यासक आहेत.)




