मुंबई : मुंबई महानगरापालिकेतील प्रशासक राजच्या माध्यमातून भाजपा महायुती फक्त स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत आहे. मुंबईतील रस्ते, प्रदुषण, आरोग्य सुविधा याकडे सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष केलेले आहे. आता कांजूरमार्गच्या डंपिग ग्राऊंडवरून न्यायालयाने बीएमसीला फटकारले आहे. तसेच वायूप्रदूषणावरही न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले.महायुतीच्या कारभाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत असा गंभीर आरोप करत मुंबईकरांना स्वच्छ हवाही देऊ न शकणाऱ्या अकार्यक्षम महायुतीला निवडणुकीत थारा देऊ नका असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना सचिन सावंत म्हणाले की, रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दंड ठोठावला, हवेतील प्रदुषणाची न्यायालयाला दखल घ्यावी लागली, ताशेरे ओढले आणि स्वतः लक्ष घातले. आता कांजूर डंपिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या दुर्गंधीबाबत तासाभरात निर्णय घ्या असा आदेश मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाने दिला. प्रत्येक बाबतीत माननीय न्यायालयालाच दखल घ्यावी लागत असेल तर सत्तेत बसून भाजपा महायुती काय झोपा काढते काय? गेली तीन वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता राबविणाऱ्या महायुतीची अकार्यक्षमता यातून स्पष्ट दिसते. मुंबईकरांच्या प्रश्नांवर भाजपा महायुतीचा एकही नेता अवाच्छरही काढत नाही. आपला कुचकामीपणा दिसू नये म्हणून नेहमीप्रमाणे धर्माच्या नावाने विवाद निर्माण केला जात आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व देशाची आर्थिक राजधानी आहे पण केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असूनही मुंबईचा फारसा विकास झालेला नाही. लाडका उद्योगपती व कंत्राटदार यांच्यासाठी मुंबई विकण्यास काढली आहे. मुंबईकरांना मुलभूत सुविधाही देऊ न शकणाऱ्या भाजपा महायुतीला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत घरी बसवा, असेही सचिन सावंत म्हणाले.




