मुंबई : शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या सरचिटणीसपदी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा पक्षनिष्ठेने प्रचार व प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी स्वतःला सिद्ध करून दाखवाल, असा विश्वासही या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे म्हणाले, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने पक्षाच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही नवी जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन, याची ग्वाही देतो.
या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला गती मिळेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.




