ताज्या बातम्या

महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; मुंबईत स्वतंत्र लढण्याची भूमिका – रमेश चेन्नीथला

मुंबई : राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असून जिथे गरज असेल तिथे स्थानिक नेतृत्व आघाडीचा निर्णय घेईल.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीस हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, रेहाना रेयाज चिस्ती, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर होत आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात आघाडीवर आहे. भाजप महायुती सरकारला शेतकरी, बेरोजगारी, महिला प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेचे काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील जनता महापालिका निवडणुकांत काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे, अशी कार्यकर्त्यांची ठाम मागणी आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असून, जिथे आवश्यकता आहे तिथे भाजप महायुतीविरोधात स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय घेतला जाईल. तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून रणनिती व प्रचारात ते सक्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिळक भवनमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांशी दोन दिवस सविस्तर चर्चा झाली आहे. राज्यातील २८८ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका आणि २८ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत आढावा घेण्यात आला. काँग्रेसचा लढा वैचारिक असून भ्रष्ट महायुती सरकारविरोधात पक्ष ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरलेले नाही, भ्रष्टाचार वाढला असून राज्य विकण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top