नागपूर(भीमराव धुळप) : विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त ‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, विलास मुकादम आणि किशोर आपटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. ग्रंथनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मुद्रितशोधक सत्यवान ताठरे आणि संजीव उपरे हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
नागपूर येथील विधानभवनातील विधानपरिषद सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रास्ताविक उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले, स्वागत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले, तर आभार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मानले. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी सूत्रसंचालन केले. विधानमंडळ सचिव मेघना तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची व्यवस्था चोखपणे पार पडली.




