ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या विकासाला नवी दिशा — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर(भीमराव धुळप) : राज्यात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे खंडित झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीतून ग्रामीण महाराष्ट्रातील गावांना समृद्धीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अभियानाच्या शीर्षक गीताचे लोकार्पण करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मागील दहा वर्षांत राज्यातील प्रत्येक यशस्वी अभियानामागे लोकसहभाग हीच ताकद राहिली आहे. जलयुक्त शिवार, नरेगा ११ कलमी कार्यक्रम आणि शेततळे अभियान ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत लोकसहभागातून ही अभियानं यशस्वी झाली आणि महाराष्ट्र देशातील रोल मॉडेल म्हणून ओळखला गेला.

समृद्ध पंचायतराज अभियानाचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले—
• ग्रामपंचायती डिजिटल आणि स्वयंअर्थपूर्ण बनल्या पाहिजेत
• पर्यावरणपूरक, स्वच्छ, जलसमृद्ध आणि सर्वांगीण विकास असलेली गावे घडली पाहिजेत
• लोकसहभाग आणि श्रमदानातून ग्रामविकासाची चळवळ उभी राहिली पाहिजे

अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल, त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री शिवाली परब, तसेच ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची पार्श्वभूमी मांडली, तर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

• 2025-26 पासून राज्यभर स्पर्धात्मक स्वरूपात अंमलात
• चार स्तरांवर स्पर्धा — तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य
• केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे प्रभावी अभिसरण
• सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायती निर्माण करणे
• मनरेगा व इतर योजनांच्या समन्वयातून उपजीविका व सामाजिक न्यायाला चालना
• लोकसहभाग, श्रमदान आणि प्रोत्साहनपर पुरस्कार हे अभियानाचे मुख्य घटक

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top