मुंबई(रमेश औताडे) : गेल्या शंभर वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा विज पुरवठा मुंबईत सुरू आहे.आशिया खंडात या वीज उपक्रमाचे नाव गौरविले गेले आहे. मात्र आता धारावी सारख्या भागात अदानी कंपनी शिरकाव करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करून जनतेला व कामगारांना न्याय देणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युनियनचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मसु ढवळे ,अतिरिक्त सरचिटणीस पवन गायकवाड, आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश समिती प्रणाली राऊत उपस्थित होते.
बेस्ट उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत असल्याने विद्युत कायदा २००३ च्या कलम १४ अन्वये त्याच्या परवाना क्षेत्रात कोणतीही स्पर्धा लागू होत नाही. त्यामुळे या क्षेत्रात खाजगी कंपनीला परवाना देणे बेकायदेशीर असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने त्यांच्या वितरण परवान्यात सुधारणा करून धारावीचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र विज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. या प्रस्तावावर दैनिक लोकसत्तामध्ये सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट विज कामगारांनी व समर्थकांनी तीव्र हरकती दाखल केल्या आहेत.
कामगार संघटनांचे म्हणणे आहे की अदाणी कंपनीकडे कामगार कपात, कंत्राटी पद्धती, वेतन करार प्रलंबित ठेवणे, न्यायालयीन दंड अशा अनेक बाबतींत आंधळा कारभार आहे. त्यामुळे अशा कंपनीला धारावीचा विज पुरवठा देणे धोकादायक ठरेल. या पार्श्वभूमीवर सरकारने कोणताही निर्णय न घेतल्यास झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला.




