ताज्या बातम्या

शिक्षकांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांना लगावली फटकार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिक्षक भारतीची तक्रार

मुबई : गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी समाजमाध्यमांवर केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा शिक्षक भारती संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की, आमदार बंब सातत्याने अनुदानित शाळांतील शिक्षकांची प्रतिमा मलीन करत असून “शिक्षक बसून पगार घेतात, त्यांना कामावरून काढावे” अशा प्रकारची व्यक्तव्ये करून समाजात नकारात्मक भावना पसरवित आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा अवमान केला जात असल्याची नाराजी संघटनेने व्यक्त केली.

शिक्षक भारतीने म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागातही शिक्षक शिक्षण पोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अपुऱ्या सुविधा, अन्यायकारक धोरणे आणि विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्यातही शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत आमदारांनी शिक्षकांचा अपमान करणे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.

संघटनेची मागणी आहे की आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांची माफी मागावी आणि अशा संतापजनक वक्तव्यांपासून दूर राहावे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना योग्य समज द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनावर अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांच्या स्वाक्षऱ्या असून शिक्षक भारती संघटनेच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top