मुंबई(रमेश औताडे) : हलकीचे जीवन जगत असताना आमच्या झोपड्या तोडल्या जातात. आमची मुले संसार रस्त्यावर येत आहे. या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर या जनतेच्या वतीने मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केला आहे.
बोरिवली पश्चिम येथील पैनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त प्रफुल तांबे यांची भेट घेण्यात आली. पै नगर परिसरातील नागरिकांना वारंवार बेघर केले जात असल्याने सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही झोपडीवर कारवाई करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरिबाना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजे. पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे म्हणजे दुर्बल घटकांवर अन्याय करणे होय असे सचिन लोंढे यांनी सांगितले.




