ताज्या बातम्या

असंघटित कामगारांचा आधारवड हरपला

असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे ज्येष्ठ कामगार नेते, पुरोगामी चळवळीचे आधारवड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचे सोमवारी ( दिनांक ८ डिसेंबर ) रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने कष्टकरी, श्रमजीवी वर्गासाठी आयुष्य वेचणारे नेतृत्व हरपले. त्यांच्या निधनाने या वर्गाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ बाबा आढाव यांनी कष्टकरी, श्रमजीवी वर्गासाठी जितके कार्य केले तितके कार्य याआधी कोणीही केले नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा सांगणाऱ्या बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. ते नाना पेठेतील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर होते. बाबा आढाव यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच म्हणजे १९५३ सालीच सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेच्या तरुणांना समाजवादी विचारांची भुरळ पडली होती तशी भुरळ बाबा आढाव यांनाही पडली म्हणूनच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करून सामाजिक कार्यास सुरुवात केली. १९७० सालापर्यंत बाबा आढाव समाजवादी पक्षाबरोबर राहिले या काळात त्यांनी अनेक आंदोलन केले. ते पुण्याचे नगरसेवकही होते. नाना पेठ हा शहरातील बाजार पेठेचा भाग असल्याने अनेक व्यवसायातील कामगार, हमाल तिथे येत असत त्यामुळे कामगारांना येणाऱ्या अडचणी बाबा आढावा यांच्या लक्षात येऊ लागल्या हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. या गोष्टीचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. अखेर १९६६ साली त्यांनी आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले. १९७० नंतर मात्र बाबा आढाव यांनी राजकारणातून फारकत घेऊन कष्टकरी श्रमजीवी वर्गासाठी अर्थात असंघटित वर्गासाठी काम करण्याचे ठरवले. या वर्गाला त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. नडलेल्या, नाकारलेल्या उपेक्षित घटकांपर्यंत स्वातंत्र्याचे नि सार्वभौम लाभ पोहचवण्याचे काम त्यांनी केले. हमालपंचायत, , रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद – पत्रा – काच वेचक कष्टकरी पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, टेम्पो पंचायत अशा अनेक असंघटित कामगाराच्या संघटना त्यांनी बांधल्या. या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी असंघटित कामगारांना न्याय, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हमाल पंचायतची स्थापना ही त्यांच्या कार्याचा महत्वाचा टप्पा ठरली. हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबा आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. जातीय भेदभावा विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवला. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत जवळपास पाच दशकांहून अधिक काळ बाबा आढाव यांचा सहभाग राहिला. बाबा आढावांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे त्यांना असणारे राजकीय व्यवहार्यतेचे भान. असंघटित कामगारांचे संघटन करताना शोषणाच्या कमी अधिक प्रमाणात लढत राहणे, असंघटितांसाठी लढताना शासनाशी आर्थिक मागण्या न करता स्वायत्तपणे सहकारी संस्थांमधून सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचे प्रयत्न करणे आणि सामाजिक प्रबोधन घडवणे. संशोधन संस्थांचे सहाय्य घेऊनही संघर्षात्मक राजकारणाचे प्राधान्य कायम ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील कळीच्या मुद्यावर राजकीय भूमिका घेण्याचे धाडस दाखवणे अशा सर्व पातळ्यांवर बाबा आढावांमध्ये व्यवहार्यतेचे भान स्पष्ट होत जाते. संघर्ष आणि प्रबोधन अशा दुहेरी मार्गांनी झालेली त्यांच्या नेतृत्वाची वाटचाल पुरोगामी राजकारणाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील अढळ तारा निखळला. त्यांच्या निधनाने असंघटित कामगारांचा आधारवड हरपला. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top