प्रतिनिधी :

नमुंमपाचे ईटीसी केंद्र हे नवी मुंबई शहरातील दिव्यांग मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. दिव्यांग मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. याकरिता विविध स्तरांवर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांग मुलांना प्रोत्साहन दिले जाते व सहभागासाठी प्रयत्न केला जातो.
दि. 8 डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखेपाटील फाऊंडेशन आणि जनसेवा फाऊंडेशन, लोणी यांच्या संयुक्त् विदयमाने संपन्न झालेल्या स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र स्पर्धेअंतर्गत राज्यस्तरीय सायकलिंग व ज्युडो स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विळदघाट बायपास महामार्गावर दिव्यांग मुलांची विशेष सायकल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी केंद्रामधील मतिमंद विभागातील कु. ओजस राहुल अडागळे या मुलाने 05 किमीचे अंतर जलद पार करीत सायकलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धांमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, रायगड, ठाणे, वाशिम, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यांतील दिव्यांग मुले सहभागी झाली होती. यावेळी स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमैय्या, जिल्हाध्यक्ष धनश्री विखे पाटील, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह राज्यभरातील क्रीडा शिक्षक, पालक व दिव्यांग खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.
ओजसने मिळवलेल्या यशाबद्दल महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्याची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगितले आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व ईटीसी संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांनीही ओजस अडागळेचे अभिनंदन करीत त्याला प्रोत्साहन देणा-या पालकांचे तसेच ईटीसी टीमचे कौतुक केले आहे.




