मुंबई : शिक्षक भारती संघटनेतर्फे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देऊन ५ डिसेंबर २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनकपाती संदर्भातील शिक्षण संचालकांचा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर तसेच संस्थाचालकांच्या सर्व प्रमुख संघटनांच्या आवाहनानुसार ५ डिसेंबर रोजी खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी शांततेत शाळा बंद आंदोलन केले होते. शैक्षणिक गुणवत्ता टिकविणे, अनुदानित शिक्षण वाचविणे व प्रलंबित मागण्यांवर शासनाशी चर्चा व्हावी या उद्देशाने संविधानिक मार्गाचा अवलंब करून हे आंदोलन करण्यात आले होते.संघटनांच्या म्हणण्यानुसार आंदोलक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला घटनात्मक अधिकार वापरला असून अशा शांततापूर्ण आंदोलनाबाबत वेतनकपात करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांनी दिलेला वेतनक पातीचा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, अध्यक्ष अशोक बेलसरे आणि संस्थापक कपिल पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.निवेदन स्वीकारताना शिक्षणमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




