ताज्या बातम्या

पुरुष गटात लातूर व महिला गटात पुणे विभागांचे संघ नमुंमपा चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपदाचे मानकरी

प्रतिनिधी :


‘नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26’ मध्ये पुरुषांच्या गटात लातूर विभागीय संघाने मुंबई विभागीय संघावर तसेच महिलांच्या गटात पुणे विभागीय संघाने लातूर विभागीय संघावर मात करीत स्पर्धेचे अजिंक्यपद महानगरपालिका चषकासह पटकाविले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिशन व नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी यांच्या सहकार्याने आयोजित या 18 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त तथा राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू श्री.संजय येनपुरे, अर्जुन पुरस्काराने सन्मानित क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री रेवप्पा गुरव, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे चेअरमन श्री.संजय नाईक व सचिव श्री. निलेश जगताप, साहसी खेळांतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्री.शुभम वनमाळी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.अजित पाटील, मुंबईचे विभागीय सचिव श्री. धनंजय वनमाळी, पुण्याचे विभागीय सचिव श्री.विलास घोगरे, पंचप्रमुख श्री.बाबू आचरेकर, माजी नगरसेवक श्री.राजू शिंदे व श्रीम.माधवी शिंदे, ठाणे जिल्हयाचे उपाध्यक्ष श्री.किरण स्टॅनली, विदयाभवनचे विश्वस्त श्री.दिनेश मिसाळ, निवड समिती सदस्य श्री.अनुराग नाईक व असीफ मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सह पोलीस आयुक्त श्री.संजय येनपुरे यांनी उत्तम खेळाडू म्हणून घडताना सरावात सातत्य हवे, कष्ट घेण्याची तयारी हवी व विनयशिलता हवी, जेणेकरुन हार-जीत पचवता येते असे सांगताना आत्मपरीक्षण करुन आणखी चांगली कामगिरी करण्याची जिद्द कायम ठेवायला हवी असे प्रतिपादन केले. या निवड चाचणीतून निवडले जाणारे 18 वर्षाखालील मुलांचे व मुलींचे ज्युनियर्सचे संघ राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून सर्वोत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

दि.६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानात नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२४-२५ अतिशय उत्साहात संपन्न झाली. यामध्ये मुंबई, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, लातूर, कोल्हापूर अशा आठ विभागांच्या पुरुष व महिलांच्या संघांनी सहभागी होत सर्वोत्तम क्रीडागुणांचे दर्शन घडविले. या स्पर्धेत गुणवत्तापूर्ण खेळ करणाऱ्या खेळाडूंची निवड करून महाराष्ट्र राज्याचा पुरुष व महिलांचा ज्युनियर व्हॉलीबॉल संघ जाहीर करण्यात आला. हे संघ राजस्थान येथे 16 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहेत.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ होऊन दोन दिवस अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष गटात लातूर विभागाच्या संघाने मुंबई विभागाच्या संघावर मात करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकाचा व अमरावती विभाग चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. मुंबई विभागातील यश शेट्टी या खेळाडूस मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर विभागातील रोहित बोकारडे हा खेळाडू बेस्ट स्मॅशर पारितोषिकाचा व लातूर विभागातील सय्यद फैजान हा खेळाडू बेस्ट सेटर पारितोषिकाचा मानकरी ठरला.

महिला गटाच्या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाने लातूर विभागाच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत करुन विजेतेपद पटकाविले. नाशिक विभाग तृतीय क्रमांकाचा व मुंबई विभाग चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. पुणे विभागातील साक्षी साळुंखे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर विभागातील श्रुती राऊत ही खेळाडू बेस्ट स्मॅशर पारितोषिकाची व पुणे विभागातील समृध्दी चांदगुडे ही खेळाडू बेस्ट सेटर पारितोषिकाची मानकरी ठरली.

ही निवड चाचणी स्पर्धा असल्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या व्हॉलीबॉलपटूंची निवड राष्ट्रीय ज्यूनियर अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र संघात करण्यात आली.

18 वर्षाखालील मुलींचा संघ – साक्षी अभिजीत साळुंके (पुणे), वैष्णवी चंद्रकांत अडलिंगे (पुणे), समृध्दी चंद्रकांत चांदगुडे (पुणे), वर्षा शिवाजी काळे (पुणे), लक्ष्मी प्रशांत माळी (मुंबई), श्रुती आप्पासाहेब राऊत( लातूर), संस्कृती अश्रूबा गाढवे (लातूर), आश्लेषा नवनीत झोले (नाशिक), डोंगरे स्वरा तुषार (नाशिक), अक्षदा अंकुश पवार (अमरावती), पार्शती समर्थ गुंडगे (कोल्हापूर), विशाखा सतिश मोरे (नागपूर), गिरीजा सरोजीराव पवार (नागपूर), रिश्मा रमेश शेट्टी (पुणे) आणि आरुषी संजय कुबडे (नागपूर), प्रणाली बाळासो पवार (पुणे), तनिष्का अरुण निकम(नाशिक), निधी ज्ञानेश्वर थोपटे(लातूर).

18 वर्षाखालील मुलांचा संघ – शेख झोऐब शहनवाज (लातूर), सयू फैजान समीर(लातूर), आर्यन जीवन वाठवडे(लातूर), यश हरीश शेट्टी(मुंबई), समर्थ रेवप्पा गुरव(मुंबई ), निहाल संतोष जाधव(मुंबई), रोहित दिपक बोकरे(कोल्हापूर), मोहम्मद सेहान असिफमुल्ला (कोल्हापूर), पार्थ किरण ताजणे( पुणे), रविराज विकास भारती (पुणे), सलमान मजहर शेख (संभाजीनगर), चिखलवार कर्मण्य प्रवीण (नागपूर), अनुराग विनोद काळमेघ (अमरावती), आदित्य अजय जाधव (कोल्हापूर) आणि उत्कर्ष सिध्दगोंडा पाटील (कोल्हापूर), भरत काशीनाथ पवार (नाशिक), प्रणय राजेश मत्ते (नागपूर), शिवतेज नागेश मांगली (पुणे).

नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा अतिशय नियोजनबध्दरित्या आयोजित करुन राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत उत्तम आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे व सर्व टीमचे आभार मानण्यात आले. या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या व्हॉलीबॉलपटूंचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top