कराड(प्रताप भणगे) :

हिंगनोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्व. यशवंतराव बालक्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून आपला दबदबा सिद्ध केला आहे. बीटस्तरीय तसेच तालुकास्तरीय स्पर्धांत विद्यार्थ्यांनी प्रभावी कौशल्याचे प्रदर्शन करत बहुमानाचे स्थान पटकावले.
बीटस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटाने प्रथम तर तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवत ज्ञानकौशल्याची चमक दाखवली. बाललघुनाटिकेत बीटस्तर व तालुका या दोन्ही स्तरांवर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या सांस्कृतिक क्षमतेची चुणूक दाखवली. लांबउडीत बीटस्तरीय प्रथम व तालुक्यात द्वितीय क्रमांक, तसेच हस्ताक्षर स्पर्धेत मोठा गट प्रथम व लहान गट तृतीय क्रमांक असा बहुमान मिळाला.
बीटस्तरीय निबंध स्पर्धेत मोठा गट तृतीय, थाळीफेक स्पर्धेत तृतीय, 200 मी धावण्यात प्रथम तर 100 मी धावण्यात तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यार्थ्यांनी सर्वांगिण गुणवत्तेची जोरदार नोंद केली.
या सर्व यशासाठी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे तसेच ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती हिंगनोळे यांचे हार्दिक अभिनंदन. शाळेने मिळवलेले हे यश कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.




