कराड(विजया मान) : दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व साप्ताहिक कराड न्यूजचे प्रतिनिधी साहित्यभूषण सत्यवान मंडलिक यांना गडचिरोली येथे ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा २०२५’ राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.*
गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या नामांकीत संस्थेच्या वतीने महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व साप्ताहिक कराड न्यूजचे साहित्य प्रतिनिधी साहित्यभूषण सत्यवान मंडलिक यांचा यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा रंगकर्मी प्राचार्य एस एन पठाण व जेष्ठ रंगकर्मी, प्रमुख पाहुणे समिक्षक व कादंबरीकार प्राचार्य डॉ शाम मोहरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. रंगकर्मी, दिग्दर्शक, साहित्यिक डॉ नीलकांत कुलसंगे, गोंदियाच्या ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम-ताराम,जेष्ठ पत्रकार विनोद देशमुख इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. लेखक सत्यवान मंडलिक यांच्या ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या वैचारिक लेखसंग्रहासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, स्वदेशी भारत सन्मान, सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण, साहित्य प्रेरणा, स्व. राजाराम डाकवे अशा राज्यस्तरीय पुरस्काराने तसेच संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आता गडचिरोली येथे ‘महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार’ हा सातवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या साहित्य प्रवासात वेगवेगळे असे तीस पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाट्यश्री साहित्य कला मंचचे प्रमुख तथा संयोजक व प्रख्यात नाटककार चुडाराम बल्हारपुरे व सर्व सदस्य यांनी योग्य नियोजन करून हा कार्यक्रम पार पाडला आहे. तसेच अनेक नाट्य प्रेमी या सोहळ्याला उपस्थित होते.




