नाशिक : राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले,
“शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही युती जुनी, मजबूत असून कायम राहील.”
उपमुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच केलेल्या
“युती किमान २ डिसेंबरपर्यंत तरी टिकायला हवी,”
या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला होता. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वादानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार, २८ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण करत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले,
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे याचा अभ्यास करूनच अधिकृत भूमिकेची घोषणा करू. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो.”
राज्यातील निवडणूक प्रक्रिया, ओबीसी आरक्षणाचा विषय आणि युतीतील अंतर्गत मतभेदाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे आजचे विधान राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे.




