मुंबई : घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या कित्येक दशकांपासून लढा सुरु असून राज्यभरात शेकडो आंदोलने झाली, हजारो बांधवांवर गुन्हे दाखल झालेत. शेकडो बांधवांनी उपोषणे केली, लाखोंचे मोर्चे निघाले परंतू समाजाला न्याय मिळाला नाही.
त्यामुळे राज्यभरातील समाज बांधव, माता-भगिनी, मुलांना घेवून २१ जानेवारी २०२६ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार असल्याची माहिती मल्हार योध्दा दिपकभाऊ बोऱ्हाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे २०१४ साली धनगर समाज भाजपासोबत गेला. धनगरांनी मोदींना पंतप्रधान आणि फडणवीसांना मुख्यमंत्री बनवले याच उपकाराची जाणीव ठेवून दिलेला शब्द पाळण्याऐवजी त्यांनी धनगरांना मुर्ख बनवले असे दिपकभाऊ बोऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले.
सप्टेंबर मध्ये मी स्वतः जालना येथे १६ दिवस आमरण उपोषण केले. राज्यातील एक ऐतिहासिक आंदोलन जालना येथे झाले. परंतू सरकारला अजुनही जाग आली नाही. त्यामुळे आता माघार नाही असे बोऱ्हाडे यांनी सांगितले. यावेळी धनगर समाजाचे प्रमुख महादेव अर्जुन, अशोकराव पातोड, प्रल्हाद नेमाने, निखिल वीर, अमोल गावडे, शाम बोऱ्हाडे, प्राध्यापक राजाराम काळे इतर पदाधिकारी उपस्थित होते.




