
मेढा (अजित जगताप) : २०२९ आली महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करताना आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. देवेंद्र फडणीस सर्वांचे मालक आहेत .मेढ्याला आम्ही सोडणार नाही. वेळ आली तर मेढा उचलून साताऱ्यात घेईन त्यामुळे जावळी मतदारसंघाच्या भानगडीत पडू नका. असा सुचक इशारा जावळी आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
मेढा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने मेढा येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री भोसले बोलत होते. या वेळेला युवा नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, गीताताई लोखंडे, पांडुरंग जवळ, कांतीबाई देशमुख, रूपाली वारागडे, दत्ता पवार, एकनाथ रोकडे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे , संतोष वारागडे, मच्छिंद्र मुळीक, दिपक कदम, शिवाजीराव देशमुख, डॉ. संपत कांबळे व मेढा नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेढा नगरीच्या विकास कामासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे कुणी जावळीच्या सत्तेसाठी मुंगीर लाल की हसीन सपने बघू नये .राजा गेला की, सरदार फाडून टाकतात. कितीही टीका केली तरी विकास काम करतच राहणार आहे. टीकाकारांना महत्व देण्यात येत नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. मेढा नगरपंचायतीचे सर्वच्या सर्व १७ भाजपचे नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येणार असल्याने विरोधी पक्ष आणायचा कुठून? त्यासाठी मार्ग काढू असे स्पष्ट केले.
भात क्षेत्रातील जमिनीवर औद्योगिक वसाहत निर्माण करणे कठीण आहे. अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील एम.आय.डी.सी. झाली की मग जावळीतही एमआयडीसी उभी केली जाईल असे खोचक त्यांनी सांगितले. शिवेंद्रबाबा हे डायबिटीस सारखे आहेत. सोडत नाहीत. हळूहळू खाऊन काम काढतात. असे त्यांनी विरोधकांना इशारा दिला. दरम्यान ,पर्यटनासाठी जावळीतील मेढ्यात आठ दिवसांसाठी आलेल्यांना विकासाची काही देणे घेणे नाही. मतमोजणी दिवशी ३ डिसेंबर रोजी दुपारी अकरा वाजता भाजपचे कमळ फुलल्यानंतर हॉटेल प्रमाणे चेक आऊट टाईम झाल्यानंतर ते जावळी सोडतील. अशी आता निवडणुकीपूर्वीच चर्चा सुरू झालेली आहे.
______________________
फोटो — मेढा या ठिकाणी निवडणूक प्रचार निमित्त मार्गदर्शन करताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर (छाया– अजित जगताप, मेढा)




