नांदेड(उध्दव सरोदे) : पी.एम.श्री.केंद्रीय विद्यालय,एस.सी. आर नांदेड येथे नोव्हेंबर २०२५ या महीन्याच्या कालावधीतील राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला. या सप्ताहा मागील महत्त्वाचे व विशेष कारण म्हणजे वाचन संस्कृतीला चालना देणे,विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालया विषयी आकर्षण निर्माण करणे आणि ‘पुस्तक हेच सर्वोत्तम मार्गदर्शक’ ही भावना दृढ करणे हे या आठवड्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक कुमार विश्वकर्मा यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतीय ‘ग्रंथपालनाचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ग्रंथालय आठवड्याची सुरुवात करण्यात आली.भारतात दरवर्षी १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा केला जातो. १४ नोव्हेंबर हा बालदिन आणि पंडित नेहरू यांचा जन्मदिवस असल्याने, मुलांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडण्यासाठी या दिवशी ग्रंथालय सप्ताहाची सुरुवात होते.डॉ.रंगनाथन यांनी मांडलेल्या “पुस्तक प्रत्येकांसाठी आणि प्रत्येकाला त्याचे पुस्तक” या पाच ग्रंथालय नियमांवर आधारित सेवा आजही संपूर्ण देशात ग्रंथालय कार्याला दिशा देतात.वाचन संस्कृती, माहिती साक्षरता,पुस्तकांचे जतन, ज्ञानप्रसार आणि ग्रंथालय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी पुस्तके आणि डिजिटल स्रोत यांचा संतुलित वापर करावा, यासाठीही हा उपक्रम प्रेरणा देतो.या आठवड्यात शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.पहिल्या दिवशी “पुस्तक माझा मित्र” या विषयावर पोस्टर बनविणे आणि वाचन प्रोत्साहन भाषण स्पर्धा घेण्यात आली.१५ नोव्हेंबरला “बुकमार्क बनवा” हा उपक्रम पार पडला,ज्यात विद्यार्थ्यांनी सर्जन शीलतेने वाचन संदेश असलेले आकर्षक बुकमार्क तयार केले.१६ नोव्हेंबर रोजी “ग्रंथालय ओळख मोहीम”अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वर्गीकरण, कॅट लॉगिंग आणि ग्रंथालयातील विविध विभागांची माहिती देण्यात आली.
१७ नोव्हेंबरला “माझे आवडते पुस्तक – कथा सांगून दाखवा” हा उपक्रम झाला,ज्यात लहान मुलांनी कथा सांगण्याच्या कलेद्वारे आपली प्रतिभा सादर केली.१८ नोव्हेंबर रोजी शालेय स्तरावरील “वाचन स्पर्धा व पुस्तक परेड” असे विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरली.१९ नोव्हेंबरला डिजिटल वाचनाची ओळख करून देण्यासाठी “ई-लायब्ररी आणि ऑनलाईन संसाधन कार्यशाळा” आयोजित करण्यात आली.
२० नोव्हेंबर रोजी आठवड्याचा समारोप “सर्वोत्तम वाचक व बुकमार्क स्पर्धा पुरस्कार वितरण” कार्यक्रमाने झाला.यावेळी प्राचार्य अशोककुमार विश्वकर्मा व मुख्याध्यापक राम श्रृंगारे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ग्रंथालय प्रमुख डॉ.मितेश हनवते, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.ते म्हणाले की,“पुस्तक ही ज्ञानाची अखंड शक्ती आहे.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी वाचनाच्या व्यसनाशी घट्ट जोडले जातात.ग्रंथपाल प्रमुख ”डॉ.मितेश हनवते म्हणाले की, राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह २०२५ हा केवळ उत्सव नव्हता तर विद्यार्थ्यांना ज्ञान प्रेमाची प्रेरणा देणारा एक समृद्ध अनुभव ठरला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल घोबाले,दत्ता बदाले पाटील,गुलशन कुमार हंस, प्रिया भगत,रवि खराते,रमेश कदम, दत्ता सांगले यांचे मार्गदर्शन लाभले.व सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह नियोजनबद्धरित्या यशस्वी संपन्न करण्यात आला.




